श्री स्वामी समर्थांची पद्कमले
श्री स्वामी समर्थ स्वमिभवनात सगुण रुपात अस्तित्वात आहेत.श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिला - मी उभा आहे. माझे पाय दुखतात ,माझ्यासाठी मंचक घडवा.
त्यानुसार श्री स्वामी समर्थांसाठी मंचक घडविला गेला. त्यानंतर स्वामींच्या मंचकाला असलेल्या पायऱ्यांवर पाउले उमटलेली दिसली. तो शुभदिन म्हणजे गुरुपोर्णिमा २०१३
काही दिवसांनी परत तोच अनुभव मिळाला.त्यानंतर परत तोच स्वामी पुण्यातिथी च्या आदल्या रात्री (२०१४ साली )श्री स्वामी समर्थांची शेजारती करीत असताना मंचकाच्या
खालच्या पायरीवर पाउल उमटत असताना दिसले.
माननीय उज्वलाताई दाते
श्री स्वामी समर्थ परिवाराला आलेले अनुभव
- श्री स्वामींच्या मठासाठी जमीन खरेदी करताना आलेले अनुभव
प.पू. नाना करंदीकर, संस्थापक, श्री स्वामी समर्थ परिवार यांना प्रत्यक्ष श्री स्वामींनी
दर्शन देऊन ‘मुंबई पुणे रस्त्यावर निसर्गरम्य ठिकाणी माझ्या मठाची स्थापना कर’ असा आदेश दिला होता.
योगायोगाने त्यावेळी श्री स्वामी समर्थ परिवाराचे एक सदस्य श्री रा.म.बोरकर यांच्या लोणावळा येथील वकील आप्तेष्टांकडून मंदिरासाठी जागा नांगरगांव, लोणावळा येथे सहज उपलब्ध झाली. (ही जागा मंदिरासाठी राखीव होती हे विशेष)
ह्या जमिनीसाठी लागणारे पैसेही सहजपणे उपलब्ध झाले. त्याची कथा अशी की प.पू. नानांनी सर्व स्वमिभाक्तांना लेखी जप लिहिण्याचे आवाहन केले होते. १३ कोटी जपाचा संकल्प सोडला होता. त्याला स्वामी भक्तांनी प्रचंड प्रमाणात प्रतिसाद दिला. त्यानिमित्य ठाणे येथे एक यज्ञ आयोजीत करण्यात आला. व स्वामी भक्तांनी लिहिलेल्या जपाची शोभायात्रा मोठ्या थाटाने ठाणे शहरात काढण्यात आली. त्यावेळी स्वामी भक्तांनी केलेल्या समर्पणातून समारंभाचा खर्च वजा जाऊन उरलेली रक्कम ही जागेच्या विक्री किंमतीएवढीच होती. काय चमत्कार ! प.पू. नानांनी हाती घेतलेल्या श्री स्वामी समर्थांच्या कार्यासाठी प्रत्यक्ष श्री स्वामींचे केवढे पाठबळ आहे याचा अनुभव भक्तांना मिळाला.
- श्री स्वामीभवनाचे बांधकाम सुरु असताना आलेले अनुभव
श्री स्वामींच्या मठासाठी जागा खरेदी झाली नि त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरवात झाली.
बांधकामासाठीचा आराखडा प्रत्यक्ष श्री स्वामींनी नानांना स्वप्नात दाखविला. मंदिराचा कळस व त्यानंतर असलेले तीन पिरामिड्स कसे असावेत याचा आराखडा प.पू.नानांनी स्वतः काढून रचनाकारास दिला. बांधकाम सुरु झाले आणि श्री स्वामी समार्थांची बांधकामावर देखरेख असल्याचा अनुभव मिळाला.
एके दिवशी पिरामिड्चे काम चालू असताना एक उंच धिप्पाड, दाढी असलेली व स्वच्छ पांढरा लेंगा व झब्बा परिधान केलेली तेजस्वी व्यक्ती आली व वर चटकन चढून त्या व्यक्तीने बांधकामाचे निरीक्षण केले व त्यासंबंधीच्या काही महत्वपूर्ण सूचना बांधकाम कंत्राटदाराला दिल्या. त्या महत्वपूर्ण सुचनेनुसार पिरामिडचे बांधकाम करण्यास कंत्राटदाराने सुरवात केली. व त्याला येत असलेल्या अडचणी सहज दूर झाल्या. ही व्यक्ति कोणाच्याच परिचयाची नव्हती. काय आश्चर्य !
- श्री स्वामींच्या मूर्तीसंबंधीचे अनुभव
श्री स्वामींनी त्या स्वरुपात प.पू.नानांना दर्शन दिले. तशीच मूर्ती घडविण्याचे ठरले. त्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार श्री श्याम सारंग यांची नियुक्ती करण्यात आली व मूर्ती कशी असावी यासाठी नानांनी त्यांना श्री स्वामी समर्थांचा फोटो दिला परंतु श्री सारंगांना असा प्रश्न पडला की फक्त फोटोवरून श्री स्वामी समर्थ पाठीमागून कसे दिसतात हे काहीच कळू शकत नाही. ते या संबंधी विचारात असताना त्याच रात्री ‘श्री स्वामी समर्थ’ श्री सारंगांच्या स्वप्नात आले व “मी पाठीमागून कसा दिसतो ते बघ” असे म्हणून श्री स्वामी समर्थ स्वतःभोवती फिरले. व श्री सारंगांना मूर्ती कशी असेल या संबंधी प्रत्यक्ष दर्शन घडविले.
श्री स्वामींची ६|| फूट उंचीची व १००० किलो वजनाची आजानुबाहू मूर्ती तयार झाली. मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी स्वामीभवन, लोणावळा येथे आणण्यात आली. फक्त ४/५ सेवेकऱ्यांनी ती १००० किलो वजनाची मूर्ती २|| फूट उंचीच्या चौथऱ्यावर सहजपणे चढविली कारण त्या सेवेकऱ्यांना मूर्ती वजनाला हलकी लागली.
श्री स्वामींनी ‘मी प्रत्यक्ष येथे सगुणरुपात उभा आहे’ याची जाणीव भक्तांना करून दिली.
- कलशांतील श्री फळातून श्री स्वामींनी दिलेले दर्शन
२ डिसेंबर, २००५, देव दिवाळीचा शुभदिवस. पूजनीय नानांच्या सुकन्या व परिवाराच्या अध्यक्षा
सौ. उज्ज्वलाताई दाते यांना प्रत्यक्ष श्री स्वामींनी आपल्या अस्तित्वाची प्रचिती दाखविली.
अनेक दिवस सौ. उज्ज्वलाताईंची मनोदेवता त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवित होती की श्री स्वामी समर्थ त्यांना व त्यायोगे परिवारातील सर्व स्वामीभक्तांना दर्शन देणार आहेत.
आणि एक चमत्कार घडला. त्यांच्या पूजेत असणाऱ्या कलशांतील श्री फळातून एक कोवळा कोंब डोकावू लागला. बघताबघता त्या कोंबाने लोणावळा येथील श्री स्वामींच्या मूर्तीचे अर्धस्वरूप धारण केले. श्री अरविंद दाते – (सौ. उज्ज्वलाताईंचे यजमान) यांना पूजा करताना हा चमत्कार दिसला. त्यांनी सौ. उज्ज्वलाताईंना ते ‘स्वरूप’ दाखविले. सर्व स्वमिभाक्तांना ही बातमी कळली, टि.व्ही. व वृत्तपत्रांच्या माध्यमाद्वारे हे सर्वश्रूत झाले. जवळजवळ ५ ते ६ हजार स्वामीभक्तांनी दर्शनचा लाभ घेतला. आणि श्री स्वामी समर्थ परिवार कृतकृत्य झाला.
हा कोंब पूढे आठ महिने त्याच स्वरुपात राहिला. २००६ साली पूजनीय नानांच्या वाढदिवशी म्हणजे गोकुळ-अष्टमीस श्री स्वामी भवनाच्या आवारातच त्या श्रीफळाचे पुनःरूज्जीवन केले. आता त्या श्रीफळाने मोठ्या वृक्षाचे स्वरूप धारण केले असून मंदिरात येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांना तो कृपाशीर्वाद देत आहे. अनेक स्वामीभक्त त्या वृक्षाचे रोज दर्शन घेतात.
- श्रीस्वामींनी प्रगट केलेली ‘मंचकाची’ इच्छा
श्रीस्वामींच्या अनेक चमत्कारांपैकी हा एक चमत्कार. इ.स. २००७-२००८. एका निष्ठावान व
प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थ ज्यांच्याशी संभाषण करतात अशा एका स्वामीभक्ताला मिळालेला अनुभव
श्रीस्वामींनी त्या भक्तास ‘पातंजली योगांवरील’ त्याच्या शंकांचे निरसन करता करता सांगितले की उभे राहून माझे पाय दुखू लागले आहेत. माझ्यासाठी मंचकाची व्यवस्था करण्यास तू सांग. त्या भक्ताने कुतूहलाने विचारले की ‘स्वामी आपण कोठे उभे आहात?’ श्रीस्वामींनी सांगितले की ‘मी नानांच्या लोणावळा येथील मठात उभा आहे. माझे पाय दुखत आहेत. माझ्यासाठी राजेशाही मंचकाची व्यवस्था करावी. त्यासाठी सर्वांनी समर्पण करावे.’
या स्वप्नानंतर त्यांनी सौ. उज्ज्वलाताई दाते यांना भेटून श्रीस्वामींची इच्छा सांगीतली
श्रीस्वामींनी आपली ही इच्छा अनेक मार्गांनी सौ. उज्ज्वलाताई दाते विश्वस्त व सेवेकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
मंचक तयार करण्याचा विचार पक्का झाला आणि एका रविवारी दुपारी १ च्या सुमारास गावातील रहिवासी वाटणारी एक महिला आपल्या ७-८ वर्षाच्या कन्येसह मंदिरात आली. दर्शनानंतर त्या मुलीने सौ. उज्ज्वलाताईंना प्रश्न विचारला की ‘स्वामींचा पायऱ्या असलेला मंच कुठे आहे?’ सौ. उज्ज्वलाताईंनी जवळच असलेली एक बैठक तिला दाखविली परंतू तिने परत सांगीतले की पायऱ्या असलेला मंचक मला दाखवा. तेवढ्यात त्या मुलीच्या आईने सांगीतले की अक्कलकोटला स्वामींचा पायऱ्या असलेला मंचक आहे म्हणून ही मुलगी तुम्हाला मंचकाविषयी विचारत आहे.
ती मुलगी गेल्यानंतर सौ. ताईंनी तेथील सेवकांना त्या मुलीला मंचक तयार झाल्यानंतर बोलविण्यास सांगितले परंतू त्या सेवकांनी सांगीतले की ती मुलगी व तिची आई कधीही मंदिरात आलेल्या नाहीत. त्याक्षणी सर्वांना जाणवले की हे काहीतरी अदभूत आहे.
त्या महिलेने अक्कलकोटचा उल्लेख केला व सर्वच अदभूत स्वामीलीला असल्याचे जाणवल्याने सौ. उज्ज्वलाताई व काही विश्र्वस्त अक्कलकोटला श्रीस्वामींच्या दर्शनाला व मंचकाची माहीती मिळवण्यासाठी गेले. ही मंडळी गुरुमंदिरात शेजारतीला प्रारंभ होणार त्या क्षणाला तेथे पोहचले. तिथे असलेल्या मंचकाला पायऱ्या आहेत. पायऱ्या असलेला मंचक व शेजारती कशी करायची त्याचे जणू प्रात्यक्षिकच श्रीस्वामी समर्थांनी दाखविले.
विश्र्वस्तांच्या अक्कलकोट भेटीनंतर काहीच दिवसांत मंदिरात वरचेवर येणारे एक स्वामीभक्त अक्कलकोट येथे गेले असता त्यांना श्रीस्वानी समर्थांनी ‘ताईंना फोन कर’ असे सुचविले. त्या भक्ताने सौ. ताईंना फोन केला व सौ.ताईंनी त्यांना मंचकाच्या पायऱ्यांची मापे घेण्यास सांगीतले. ते गृहस्थ स्वतः इंजीनीयर असल्याने त्यांनी मोजमाप घेण्याचे काम व्यवस्थित केले.
श्रीस्वामींची आज्ञा ‘राजेशाही मंचक’ अशी होती. राजेशाही मंचक कसा असेल अश्या विचारात सौ. उज्ज्वलाताई असतांनाच त्या व श्री दाते एका मंगलकार्यासाठी हैदराबादला अचानकपणे गेले. हैदराबाद शहर पाहण्यासाठी ते दोघे बसने निघाले असता त्यांच्या बसचा पहिला टप्पा ‘सालारगंज म्युझियम’ हा होता. आत शिरल्याशिरल्या निजामाच्या काळातील राजेशाही मंचक बघण्यास मिळाला. श्रीस्वामींच्या अदभूत दर्शनातून श्रीस्वामींनी राजेशाही मंचक घडवून घेतला.
आज श्रीस्वामींच्या आज्ञेनुसार मंचक तयार केला असून तो ‘मंचक कक्षात’ ठेवण्यात आला आहे. तेथे नियमीतपणे श्रीस्वामींची शेजारती होते.
मंचकाच्या पायऱ्यांवर उठलेल्या श्रीस्वामींच्या पावलांच्या ठश्याचा फोटो तेथे लावण्यात आला आहे.
- यज्ञ, श्रीस्वामी जयंती व परिवाराचे इतर उत्सव साजरे करीत असता आलेले विविध अनुभव -
श्रीस्वामी जयंतीच्या आधी येणाऱ्या फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला श्री स्वामी भक्तात यज्ञाचा सोहळा पार पडतो. हा सोहळा अतिशय महत्वाचा असतो, कारण त्या दिवशी असंख्य भक्तांनी गोकुळ-अष्टमी ते महाशिवरात्रीपर्यंत केलेल्या मंत्रजपाच्या वेळी बाजूस काढलेल्या उद्बत्यांचे हवन केले जाते, जणू हजारो स्वामीभक्तांनी केलेला कोटी कोटी जप यज्ञातील आहूतीद्वारे श्रीस्वामींच्या चरणी अर्पण केला जातो. या यज्ञातील विभूती म्हणजे प्रत्यक्ष श्रीस्वामींनी दिलेला प्रसाद. या विभूती लेपनाचे अनेक अनुभव आहेत.
- इ.स.२००७-२००८ मधील एक अनुभव – यज्ञ झाल्यानंतर विभूती गार होणे अतिशय
महत्वाचे असते कारण दरवर्षी यज्ञाची विभूती स्वामीजयंतीच्या दिवशी सर्वांना वितरीत केली जाते.
त्यावर्षी यज्ञ व स्वामीजयंती यामध्ये फक्त ४-५ दिवसांचे अंतर होते. रणरणते ऊन असल्याने विभूती गार होऊन छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ५००० पिशव्या कशा तयार होतील असा प्रश्न निर्माण झाला होता. मंडपाची तसेच यज्ञाची जमीन ही स्वामीजयंती पूर्वी योग्य प्रमाणात पाणी घालून थंडावा आणून मऊ करण्याची आवश्यकता होती.
यज्ञाच्या दुसऱ्याच दिवशी रणरणत्या उन्हानंतर संध्याकाळी गार वारे सुटू लागले. नभांत मेघांनी दाटी केली. आणि काही वेळातच पावसाच्या थोड्याशाच सरी पडल्या. स्वामीभवनाच्या आवारातील सर्व जमीन मऊ झाली. विभूती गार झाली आणि काळजी निवळली.
- यज्ञात तुपाची आहूती दिली जाते. ही आहूती नारळाच्या झावळीच्या खोलगट दांड्यातून
देण्याची परंपरा चालत आली होती. एके वर्षी तांब्याचे लांब दांड्याचे आहूती पात्र आणण्याचे ठरले. त्यामुळे दुसरेवर्षी यज्ञासाठी नारळाची झावळी काढून ठेवली नव्हती. यज्ञास सुरवात झाली आणि लक्षात आले की आहूती देण्यासाठी पात्र आणावयाचे राहून गेले आहे आणि तत्क्षणी बाजूच्या नारळाची झावळी खाली अगदी यज्ञाजवळ पडली. त्या झावळीनेच तुपाची आहूती दिली गेली. आणि तेव्हापासून झावळीनेच तुपाची आहूती देण्याची परंपरा परिवाराने राखली.
- २०१० सालातील अनुभव. दरवर्षी यज्ञ व स्वामीजयंतीच्या आधी श्रीस्वामी समार्थांसाठी नवीन
अलंकाराची खरेदी होते व त्याचबरोबर काही चांगल्या असलेल्या अलंकाराना पॉलिश केले जाते. त्या दिवशी यज्ञाच्या आदल्या दिवशी खास उत्सवासाठी घातले जाणारे अलंकार श्री स्वामींना घालत असताना असे लक्षात आले की श्रीस्वामी समर्थांच्या बाजूबंदाला पॉलिश करण्याचे राहून गेले आहे. नवीन बाजूबंद दुकानदाराकडून घडवून आणलेला नाही. रात्रीची १० ची वेळ व सकाळी ८ वाजता यज्ञाला सुरवात होणार होती. त्यामुळे नवीन बाजूबंद दुकानातून खरेदी करणे अशक्य होते. त्यामुळे सर्वांनाच वाईट वाटले. आपण बाजूबंद पॉलिश करण्याचे विसरलो याविषयी सौ. उज्ज्वलाताईंना खूप वेदना झाल्या.
दुसरे दिवशी सकाळी आश्चर्य घडले. सकाळचे ७.४५ वाजले होते. यज्ञ सुरु होणार म्हणून
सौ. उज्ज्वलाताई व इतर मंडळी यज्ञमंडपात येऊन बसली इतक्यात एक महिला सौ. उज्ज्वलाताईंना येऊन भेटली व म्हणाली “मी सौ. देवचके यांचेकडून आले आहे. त्यांनी या बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थांसाठी बाजूबंद पाठविला आहे.” हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. एवढ्या सकाळी ही महिला चिंचवडहून बाजूबंद घेऊन कशी आली व श्रीस्वामींसाठी नवा बाजूबंद हवा हे सौ. देवचके यांना कसे समजले? सारेच अदभूत ! श्रीस्वामी समर्थांच्या स्वामीभवनातील असलेल्या सगुण अस्तित्वाची अनुभूती देणारी ही आनंददायी घटना आहे.
४) एका स्वामीजयंतीच्या उत्सवाआधी १० दिवस ट्रान्सपोर्टरनी संप पुकारला होता. त्यामुळे
भाजीपाल्याची वाहतूकही पूर्ण बंद होती. श्रीस्वामीजयंतीला ४ ते ५ हजार लोक जेवावयास येणार होते. भाजीची योजना करणे अशक्य होते.
श्रीस्वामीजयंतीच्या आदल्या दिवशी एक गृहस्थ ६ गोणी भाजी घेऊन आले. त्या गृहस्थांची चौकशी केली असता ते म्हणाले “मी भुसावळचा आहे. माझ्या शेतातील भाजी मालगाडीने घेऊन आलो कारण इथे भाजीपाल्याची गरज असल्याचे मला समजले”. त्या गृहस्थांना चहा दिला. ते गृहस्थ गेल्यानंतर सर्वांच्या मनात एकच विचार चमकून गेला. या गृहस्थांनी ही भाजी एकट्याने कशी आणली असेल? शिवाय इथे उत्सव आहे हे त्यांना कसे समजले? सारेच अजब ! मंदिरात प्रत्यक्ष श्रीस्वामी सगुण रुपात असून ते भक्तांची काळजी घेतात याचा एक विलक्षण अनुभव !
५) श्रीस्वामीजयंतीला प्रसादासाठी प्रत्येकाने पुरणपोळ्या बरोबर आणाव्यात असे आवाहन
परिवारातर्फे केले जाते. काही भक्त पुरणपोळ्या आणतात. दरवर्षी ४ ते ५ हजार लोकंना पुरणपोळीचे जेवण देऊनही पुरणपोळ्यांची दोन पातेली कायम भरलेली राहातातच. हा अलेला पुरणपोळ्यांचा प्रसाद जे उत्सवासाठी त्या दिवशी येऊ शकले नाहीत अशा भक्तांना वाटला जातो.
- ही गोष्ट आहे २०१२-२०१३ च्या स्वामीपुण्यतिथीची. स्वामीपुण्यतिथीचा उत्सव उत्साहाने पार
पडला. अन्नपूर्णा स्तोत्र होऊन श्रीस्वामींना महानैवेद्य अर्पण केला गेला. सर्व स्वामीभक्तांची जेवणे झाली. त्या दिवशी सर्वांची जेवणे होऊनही बरेच अन्न उरले. आता या प्रसादाचे कसे वाटप करायचे असा प्रश्न उभा राहिला. परंतु श्री स्वामींच्या मनात वेगळेच होते.
थोड्याच वेळात गुरुकुल आश्रमातील ७० ते ८० मुले श्रीस्वामींच्या दर्शनासाठी आली. श्रीस्वामींच्या दर्शनानंतर त्यांना हा प्रसाद दिला गेला. लांब अंतरावरून चालत आलेल्या त्या मुलांनी आनंदाने तो प्रसाद ग्रहण केला. त्यांच्या चेहऱ्यावरची ती तृप्ती बघून सर्वांचे मन आनंदाने उंचबळून आले. जणूकाही श्री स्वामी समर्थांनी त्या आश्रमातील मुलांसाठी प्रसादाची व्यवस्था करून ठेवली होती
- श्रीस्वामीसमर्थांच्या सगुण रूपातील अस्तित्वाचा आणखी एक अनुभव – स्वामीभवनातील
श्रीस्वामीसमर्थांच्या मंचकाला दोन पायऱ्या आहेत. २००१ मधील गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न झाला आणि त्या दिवशी रात्री मंचकाच्या दोन्ही पायऱ्यांवर ठळकपणे श्रीस्वामीसमर्थांची पाऊले उमटलेली दिसले.
- त्यानंतर इ.स.२०१२ मध्ये स्वामीपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्री शेजारती चालू असताना
श्रीस्वामींच्या मंचकाच्या पायऱ्यांवर श्री स्वामी समर्थांच्या पाऊलांचे रेखाटन होत असल्याचे दिसले.
श्रीस्वामीभक्तांना आलेले विविध अनुभव
श्रीस्वामींचे लोणावळा येथील मंदिरात ‘निर्गुण’ रुपात वास्तव्य आहे याचा अनुभव अनेक भक्तगणांना आला आहे. मंदिरात प्रवेश करताच एक दिव्य शक्ति वावरते आहे याची जाणीव अनेकांना होत असते.
श्रीस्वामीभक्तांना लोणावळा येथील मंदिरात आलेले तसेच सौ. उज्ज्वलाताईंनी दिलेल्या उपासनेने आलेले काही निवडक अनुभव खाली देत आहोत.
- श्रीस्वामीजयंतीचा उत्सव साजरा केला जात होता. प.पू.नानांच्या सुकन्या सौ.
उज्ज्वलाताईंचे प्रवचन सुरु होते. त्यांना एक महिला खुर्च्या रिकाम्या असूनही बराच वेळ उभी असलेली दिसली. काही वेळाने ती खुर्चीवर बसली व पुन्हा उभी राहून प्रवचन ऐकत होती. हे सौ. उज्ज्वलाताईंनी पहिले. प्रसादवाटपाच्या वेळेस त्या महिला सौ. ताईंना भेटल्या. सौ. ताईंनी त्यांना ‘तुम्ही उभ्या का होतात?’ असे विचारले. त्या हसल्या आणि म्हणाल्या ‘समर्थांनी आज उभे राहण्याचा आदेश दिला होता.’ त्या पुढे म्हणाल्या ‘त्यांचे हे उभे राहणे त्यांच्या बहिणीला पसंत नव्हते व म्हणून तीने त्यांना खुर्चीवर बसावयास लावले परंतू त्याच वेळी गावांतील महिलांनी त्यांना उठविले.’ त्यांना समर्थांची अस्तित्वाची प्रचिती मिळाली व त्यांनी त्या संदर्भातील अनुभव सांगितला ‘एक दिवस त्या स्वामीभवनातील श्रीस्वामींच्या मूर्तीपुढे उभ्या होत्या. त्या वेळी त्या मंचकाच्या खोलीच्या दिशेने वेगाने खेचल्या गेल्या. त्यांना श्रीस्वामीसमर्थ मंचकावर पहुडलेले दिसले. स्वामींच्या भोवती दिड दोनशे लहान मुले दिसली. श्रीस्वामीसमर्थ त्या मुलात आनंदाने रमलेले दिसले. त्यावेळी त्यांनी श्रीस्वामीसमर्थांना मनोमन प्रार्थना केली की उत्सवाच्या अगोदर त्यांना काही प्रचिती मिळाली. श्रीस्वामीसमर्थांनी त्यांना दृष्टान्त देऊन सांगीतले ‘उत्सवाच्या वेळी तू उभी राहा’ आणि म्हणून त्या त्यादिवशी उभ्या होत्या. त्या बसताच त्यांना उभे केले गेले. त्यांना श्रीस्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती मिळावी.
- प्रसादासाठी शिरा आला
श्रीस्वामीपुण्यतिथीच्या दिवशी सर्व भक्तांना प्रसाद म्हणून शिरा वाटला जात होता.
नेहमीप्रमाणे १५ किलो रव्याचा शिरा केला होता. त्यावेळी अचानक अनेक भक्त दर्शनासाठी आले. शिरा कमी पडेल की काय अशी काळजी लागली. श्री स्वामी समर्थ हे सर्व पहात होते. इतक्यात एक चमत्कार झाला. एक गृहस्थ मंदिरात १५/२० किलोचा शिरा घेऊन हजर झाले. सर्वांना शिऱ्याचा प्रसाद मिळाला.
त्या व्यक्तीने सांगीतले की त्यांचा आठ वर्षांचा मुलगा चालू शकत नव्हता. त्या गृहस्थांनी स्वामीभवनातून दिली जाणारी उपासना केली व त्यांचा मुलगा पूर्ण बरा झाला. म्हणून ते शिऱ्याचा प्रसाद घेऊन आले.
- नोकरीच्या शोधात असलेला एक पुण्याचा मुलगा. नोकरी मिळत नाही म्हणून अतिशय
दुःखी होऊन सौ. ताईंना भेटण्यास लोणावळ्यास मंदिरात आला. सौ. ताईंनी त्याला उपासना दिली व तो ती करू लागला. तीन-चार महिन्यात त्याला एक छोटीशी नोकरी मिळाली. चांगल्या नोकरीच्या शोधात तो होता. सौ. ताईंनी त्याला उपासना सुरु ठेवण्याबद्दल सांगीतले. तसेच त्या म्हणाल्या ‘तुझ्यापाठी समर्थांचे आशीर्वाद आहेत. तू मनापासून भक्ती कर तुला जे जे हवे ते समर्थ देणारच.’
दोनच महिन्यात त्याला चांगल्या नोकरीची ऑफर आली. परंतू त्याच सुमारास त्याच बॉस रजेवर असल्याने त्याला नोकरीतून सोडू शकत नव्हते. त्याची नविन नोकरीवर रुजू होण्याची तारीख जवळजवळ येऊ लागली. तो सौ. ताईंना भेटला. सौ. ताईंनी त्याला धीर देत समर्थ सर्व चांगले करतील असे आश्वासन दिले. इकडे नविन कंपनीकडून त्याची रुजू होण्याची तारीख आपोआप तीन-चार दिवसांनी लांबविली गेली. त्या काळात त्याचा बॉस रुजू झाला व त्याला नविन कंपनीत जाण्यास अनुमती मिळाली. श्रीस्वामीसमर्थ आपल्या भक्तांची नेहमीच काळजी घेत असतात याचे हे उदाहरण !
- श्रीस्वामींच्या प्रार्थनेस येणारे एक कुटुंब. त्यांना श्रीस्वामींच्या कृपेचा विलक्षण अनुभव
आला. त्या कुटुंबातील एक महिला अमेरीकेत असतात. १२ वर्षापूर्वी त्यांना पेसमेकर बसविला होता. पुन्हा त्रास झाल्याने भारतात त्या ऑपरेशन करण्यासाठी आल्या. सांघिक प्रार्थनेस त्या आल्या असता त्यांनी सौ. ताईंना आपले पुन्हा ऑपरेशन असल्याचे सांगीतले. सौ. ताईंनी त्यांना उपासना दिली व सांगितले की समर्थ सर्व नीट करतील असा विश्वास ठेव.
ऑपरेशनच्या वेळी त्यांना लोकल anesthesia दिला होता. दोन डॉक्टर त्यांचे ऑपरेशन करीत होते व ती महिला त्या डॉक्टरांचे संभाषण ऐकू शकत होती. डॉक्टरांच्यात चर्चा सुरु होती की पेशंटच्या हृद्याचे ठोके कमी झाले आहेत व जुना पेसमेकर काढून नविन बसविताना काहीही होऊ शकते.
डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून त्या महिला घाबरल्या. त्यांनी समर्थांचा धावा सुरु केला. त्यांचे
हृद्याचे ठोके आपोआप वाढले. नविन पेसमेकर लिलया बसविले गेले. त्यावेळी डॉक्टर म्हणाले. ‘It is just a miracle’. श्रीस्वामीसमर्थ आपल्या भक्तांसाठी धावून येतात याचे हे उदाहरण.
- हा एका मुलीचा अनुभव – लग्नानंतर तिच्या घरी अनेक समस्या उदभवू लागल्या. हे सर्व
तिच्या पायगुणाने होत आहे असा गैरसमज तिच्या सासरच्या लोकांचा झाला. त्यांनी मुलीला माहेरी पाठवून दिले. मुलीचे आई वडिल हतबल झाले. ते सौ. ताईंना लोणावळ्याच्या मंदिरात भेटले. सौ. ताईंनी त्यांना श्रीस्वामी समर्थ सर्व नीट करतील, तुम्ही काळजी करू नका व दिलेली उपासना मनापासून करा असे सांगीतले. काही महिन्यानंतर त्या मुलीच्या सासरची एक प्रतिष्ठित व्यक्ति तिच्या माहेरी आली. त्यांना सर्व समजल्यानंतर ती व्यक्ति तशीच तिच्या सासरी गेली व त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करून मुलीला परत आणण्यास सांगीतले. त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या प्रभावाने त्या मुलीचे सासू – सासरे तिला नेण्यास स्वतः आले. आज ती मुलगी आनंदाने सासरी रहात आहे. केवढी ही स्वामीकृपा !
- तळेगावच्या एका नविन लग्न झालेल्या जोडप्याची ही कथा ! तळेगावात दोघांनाही चांगली
नोकरी होती. त्यामुळे त्यांनी जास्त भाडयाची चांगली जागा घेतली. दोन महिन्यानंतर अचानक त्या मुलाची नोकरी गेली. मुलीच्या एकटीच्या पगारात घराचे भाडे भरणे कठीण होऊ लागले. ते दुसऱ्या जागेच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना मठाची महिती मिळाली. ते मठात आले. श्रीस्वामींचे दर्शन घेऊन ते सौ. ताईंना भेटले. सौ. ताईंनी त्यांना दुसरी जागा बघण्याऐवजी नविन नोकरी शोधण्यास सांगीतले व उपासना करण्यास सांगीतले. श्रीस्वामींच्या कृपेने त्या मुलास पहिल्या नोकरीपेक्षा जास्त पगाराची नोकरी मिळाली. ते जोडपे स्वामींचे भक्त झाले.
- एका लग्न न झालेल्या मुलीची ही कथा ! तिचा दोन वेळा विवाह ठरला व नंतर मोडला
होता. कारण पहिल्यावेळी मुलाच्या घरच्यांनी लग्न तीन वर्षानंतर करावे असे सांगीतले. मुलगा अमेरीकेत होता व कदाचित तो नोकरीच्या शोधात असावा. तीन वर्षे थांबण्यास मुलीच्या आईवडिलांची तयारी नव्हती. मुलीच्या वडिलांनी मुलीचा दुसरा विवाह ठरविला. परंतु काही कारणाने तोही फिसकटला. ह्या मुलीचे आईवडिल सौ. ताईंना भेटले व सौ. ताईंनी त्यांना धीर देत सांगीतले की समर्थ योग्य तेच करतील. तुम्ही उपासना चालू ठेवा. त्या मुलीने अत्यंत श्रद्धेने उपासना करण्यास पुन्हा सुरवात केली व सहा महिन्यातच तिचा विवाह झाला. आज ती अत्यंत आनंदात आहे. श्रीस्वामी समर्थ आयुष्यात असा आनंद निर्माण करतात.
- आत्महत्या करायला निघालेल्या एका महिलेला श्रीस्वामींनी आत्महत्येपासून परावृत्त केले.
त्याचे असे झाले की लग्नानंतर ही महिला अत्यंत त्रासात होती. दादर येथून ती निघाली. व कोठेतरी निघून जाऊन आत्महत्या करण्याचा विचार करून ती बसमध्ये बसली. तिची बस लोणावळा येथे आली. ती तिथे उतरली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर लोणावळा येथे तिने स्वामीभवनाची पाटी वाचली व त्या पाटीवरील श्रीस्वामींच्या नुसत्या दर्शनानेच तिने ठरविले की आधी श्रीस्वामींचे दर्शन घ्यायचे व मग नंतर काय करायचे ते ठरवायचे. ती श्री स्वामीभवनात आली व श्री स्वामींचे दर्शन घेताच तिच्या मनातील नैराश्य नाहीसे झाले व आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याचा तिने निर्धार केला. ती परत दादरला घरी गेली. हळूहळू तिची समस्या सुटत गेली. आज ती आनंदाने संसार करत आहे. या मुलीचे आईवडिल श्री स्वामींचे भक्त असून नेहमी लोणावळा येथील मठात येतात. श्रीस्वामींच्या दर्शनाने हा फरक घडवून आणला.
- दुसरा एक अनुभव – एक महिला अत्यंत बिकट परिस्थितीने जिवाला ग्रासलेली होती. दोन
मुलांचा सांभाळ करून त्यांना शिक्षण कसे द्यायचे हा तिच्यापुढे गहन प्रश्न होत. ती स्वामीभवनात येऊन पोहोचली श्रीस्वामींचे दर्शन होताच तिला जाणवले की आपला प्रश्न फारसा मोठा नाही. श्री स्वामींच्या प्रेरणादायी नजरेतून तिला सामर्थ्य मिळाले. ती घरी गेली व संसाराचा प्रश्न तिने उत्तम प्रकारे हाताळला. आज तिची दोन्ही मुले नोकरी करीत आहेत.
- श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना क्षणिक दर्शनाने कसे व्यसनमुक्त करतात याचे हे
उदाहरण. एक गृहस्थ, अतिशय चांगल्या विचाराचे, सर्वांना मदत करणारे व श्री स्वामींचे एक निष्ठावंत उपासक. परंतू त्यांना दारूचे व्यसन लागले. एक दिवस ते घरगुती समारंभासाठी सहकुटुंब पुणे येथे गेले होते. पुणे येथून परतताना स्वामीभवनात दर्शनासाठी जावे असे त्यांना वाटले त्यांनी गाडी स्वामीभवनाच्या दिशेने वळविली. मठाजवळ गाडी आली असता त्यांची आई मुलाला म्हणाली कि तू आज मठात जाऊ नकोस. तू अभक्ष भक्षण केले आहेस. ते गृहस्थ गाडीत थांबून राहिले. इतर मंडळी मठात गेली व दोन मिनिटातच परत आली. कारण त्यांना मठ बंद दिसला. हे गृहस्थ गाडीतच होते या गृहस्थांना वाटले की असे असणे शक्य नाही. ते धावतच मठात गेले व त्यांना मठ उघडा मिळाला. त्यांनी श्रीस्वामींचे दर्शन घेतले आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणापासून ते पूर्ण व्यसनमुक्त झाले. एका क्षणाच्या दर्शनाने श्रीस्वामींनी भक्ताला व्यसनमुक्त केले.
- एक पुण्याचे गृहस्थ ! त्यांनी नविनच टाकलेले भाज्यांचे दुकान व्यवस्थित चालू होते. ते
स्वामीभवनात यायचे. त्या जागेच्या मालकाच्या मनात विचार आला की या गृहस्थांना चांगला पैसा मिळत आहे. आपण भाडे वाढवून घ्यावे. त्यांनी तसे सांगताच त्या गृहस्थांनी भाडे वाढवून दिले कारण त्यांना तेवढे उत्पन्न मिळू लागले होते परत काही महिन्यांनी मालकाने की तुम्ही ही जागा खाली करा. आता मला भाडे वाढही नको. हे गृहस्थ चिंतेत पडले व लोणावळा येथे मंदिरात आले. श्रीस्वामींचे दर्शन घेऊन ते सौ. ताईंना भेटले व आपली समस्या त्यांना सांगीतली. सौ. ताईंनी त्यांना सांगीतले की तुम्ही काही काळजी करू नका. प.पू.नानांनी दिलेली उपासना करा. श्रीस्वामी समर्थांच्या व प.पू.नानांच्या आशिर्वादाने तुम्हाला आणखी दोन वर्षांची मुदत वाढ मिळेल. त्याचप्रमाणे घडले. हे गृहस्थ सध्या नविन जागेच्या शोधात असून आनंदी आहेत.
- श्रीस्वामींच्या अगाध लीलेचे एक उदाहरण. सौ. ताईंच्या एका मैत्रिणीने नविन व्यवसाय
सुरु केला होता व ती त्यांना नेहमी दुकान बघण्यासाठी बोलवत असे. त्या एके दिवशी तिच्या दुकानात गेल्या. तीने सर्व दुकान दाखविले. त्या नंतर तीने सांगीतले की सध्या एका समस्येने तिला ग्रासले आहे. तीने सांगीतले की तिचे १२ लाख रुपये एका गृहस्थाकडे अडकले आहेत. ते गृहस्थ पैसे परत तर करीत नाहीत पण तिचा फोनही उचलत नाहीत. धंद्यासाठी तिला पैशांची अतिशय जरुरी आहे व पैसे परत आले नाहीत तर तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. सौ. ताईंनी तीला त्या गृहस्थांचे नाव एका कागदावर लिहीण्यास सांगीतले व तो कागद जवळच असलेल्या श्रीस्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेऊन श्रीस्वामींना व प.पू.नानांना त्या स्त्रीची समस्या सोडवण्यासाठी कळकळीची प्रार्थना केली. अवघ्या ५-१० मिनीटात त्या गृहस्थांचा फोन आला व त्यांनी आपण एक रकमी १२ लाख रुपये देऊ शकत नाही असे सांगीतले परंतू ३ दिवसांत आपण ४ लाख रुपये आणून देऊ व त्यानंतर सर्व रक्कम फेडू असे सांगीतले. त्याप्रमाणे त्या गृहस्थांनी ४ लाख रुपये आणून दिले.
- मुंबईचे एक गृहस्थ, त्यांना व्यवसायात बरेच कर्ज झाले होते. तसेच घरांतील सर्व
भावंडांना कुठला ना कुठला त्रास होत असे. एका रविवारी ते मठात श्रीस्वामींच्या दर्शनास आले. उशीर झाला असल्याने सौ. ताई घरी निघाल्या होत्या. तेव्हा स्वामीभवनातील सेवेकऱ्यांनी त्यांना प.पू. नाना रचित ‘स्वामी स्तवन’ म्हणण्यास सांगून एखाद्या रविवारी मठात सौ. ताईंना भेटण्यास सांगीतले. त्याप्रमाणे त्यांनी स्वामी स्तवन म्हणण्यास सुरवात केली. अचानक एका शुक्रवारी ते मठात आले. नेमक्या त्या दिवशी सौ. ताई काही कामानिमित्त मठात गेल्या होत्या. ते गृहस्थ सौ. ताईंना भेटले व त्यांनी सांगीतले की आज सकाळी स्तवन म्हणत असता श्रीस्वामींनी आदेश दिला की तू आज नांगरगांवच्या मठात जा. म्हणून ते गृहस्थ व त्यांची पत्नी मठात आले होते. सौ. ताईंनी त्यांना त्यांची समस्या विचारून उपासना सांगीतली. त्यांच्या पूर्वजांना मुक्ती ण मिळाल्याने या समस्या उदभवत होत्या व उपासनेनंतर त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण झाले.
- तळेगांवचे एक दाम्पत्य. नविनच लग्न झालेले. तो मुलगा जो व्यवसाय करीत होता
त्याला ऑर्डर येणे बंद झाले. उत्पन्नाचे दुसरे कुठलेच साधन नव्हते. अत्यंत चिंतेत असलेले ते जोडपे लोणावळ्याच्या मठात आले व श्रीस्वामींना त्यांनी मनोमन प्रार्थना केली की त्यांचा व्यवसाय पुन्हा नीट चालवा. सौ. ताईंना ते भेटले व त्यांनी दिलेल्या उपासनेने त्यांचा व्यवसाय पुन्हा उत्तमप्रकारे सुरु झाला.
- पुढील अनुभव एका वकील मुलीचा. पुण्यात ती वकिली करीत असते. ती स्वामीभक्त
आहे. एका रविवारी ती लोणावळ्यात श्रीस्वामींच्या दर्शनास आली असता ती सौ. ताईंना भेटली. तीने सांगीतले की ती पुण्यात असून यजमान मुंबईस नोकरीत आहेत. तीने यजमानांची पुण्याला केव्हा बदली होईल असे विचारले. सौ. ताईंनि त्या महिलेस सांगीतले की ‘स्वामीस्तवन’ म्हणण्यास सुरवात कर तुझा प्रश्न सहज सुटेल. त्यानंतर १५ दिवसांतच तिच्या यजमानांची पुण्यास बदली झाली. ‘स्वामीस्तवन’ उपासनेचा मोठा चमत्कार !
- श्रीस्वामी परिवारातील एक कार्यकर्ते- त्यांच्या १० वर्षाच्या मुलाच्या पोटात एकाएकी दुखू
लागले इतके की त्याला बोलता, बसता, चलता येईना. श्री **** त्याला घेऊन ताबडतोब इस्पितळात गेले. वेळ रात्री ८-८.३० ची डॉक्टरांनी तपासून ‘Apendix’ असण्याची शक्यता वर्तविली व उद्या सकाळी याला घेऊन या आपण ऑपरेशन करू असे सांगीतले. श्री **** हे ऐकून धक्का बसला. रात्र कशी निघेल असा प्रश्न त्यांना पडला. ते तेथूनच मुलाला घेऊन सौ. उज्वलाताईंकडे आले. मुलाला अक्षरशः त्यांनी उचलून आणले. सौ. उज्वलाताईंना सर्व हकीकत कथन केली. सौ. ताईंनी त्यांना व त्यांच्या पत्नीला बाहेर बसण्यास सांगीतले. मुलाला कोठे दुखते ते विचारून पोटाच्या त्या भागावर हात ठेवून त्यांनी श्रीस्वामी समर्थ व प.पू.नानांची प्रार्थना केली व मुलाच्या वेदना थांबविण्यास सांगीतले. पाचच मिनीटात मुलाने मला खूप बरे वाटते असे सांगीतले व तो धावतच आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याला धावताना बघून आईवडिलांना अतिशय आश्चर्य वाटले. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये नेले असता ऑपरेशन करण्याची जरुरी नसल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.
- एका महिलेचा हा अनुभव - तिचे लग्न झाले पण अत्यंत वाईट अनुभव आल्याने तीने
घटस्फोट घेतला होता. आपल्या पुढील भवितव्याविषयी ती काळजीत होती. तिला पुन्हा लग्न करून सुरक्षित आयुष्य जगण्याची इच्छा होती. ती सौ. ताईंकडे आली. तीने आपली सर्व हकीकत सांगून पुन्हा लग्न कधी होईल असे विचारले. सौ. ताईंनी ‘१४ मार्चला तुझे लग्न होईल’ असे सांगीतले. खरोखर त्या महिलेचे लग्न १४ मार्चला झाले. सौ. ताईंच्या हातून श्री स्वामी समर्थ व प.पू.नाना भक्तांचे प्रश्न सोडवितात याचे हे उदाहरण.
- श्री स्वामी समर्थ परिवाराचे एक ज्येष्ठ व तळमळीचे कार्यकर्ते मुलीच्या लग्नाच्या चिंतेत
होते. ते सौ. ताईंकडे आले. ते श्री स्वामी समर्थ व प.पू. नानांचे निस्सिम भक्त. सौ. ताईंनी त्यांना मुलीला वधुवर मेळाव्यास नेण्यास सांगीतले. ते मुलीला घेऊन मेळाव्यास गेले व तिथेच त्यांच्या मुलीचे लग्न जमले. अवघ्या ३ आठवडयात त्या मुलीचे लग्न ठरले.
- श्री स्वामी समर्थ परिवाराचे एक निष्ठावंत कार्यकर्ते श्री **** यांना नोकरीत फार त्रास
होत असे. सौ. ताईंनी त्यांना नियमाने सांघीक प्रार्थनेस येण्यास सांगीतले. १ मे २०१३ रोजी ते आकुर्डी (पुणे) येथून ठाण्यास संध्याकाळी प्रार्थनेस आले होते. प्रार्थना संपल्यानंतर सौ. ताईंनी त्यांना बसने पुण्यास जाण्यास सांगीतले. रात्री १० ची शिवनेरी बस त्यांनी पकडली व रात्री २ च्या सुमारास ते वाकड फाट्यावर उतरले. घर जवळजवळ ८ किलोमीटर दूर होते. पायी चालण्याशिवाय कोणताही उपाय नव्हता. श्री स्वामींचे स्तवन म्हणत ते चालू लागले. थोडयाच वेळात एक कार त्यांच्या मागून आली व वाहनचालकाने काच खालती करून श्री **** यांना गाडीत बसण्यास सांगीतले. वाहनचालकाने आपण कोठे गेला होतात असे विचारले. श्री **** यांनी त्यांना श्री स्वामींच्या प्रार्थनेबद्दल सांगीतले व आपण कोठे गेले होतात असे विचारले. त्याने ‘गरम होत होते म्हणून लोणावळ्यास फिरावयास गेलो होतो’ असे सांगीतले. एवढे बोलणे होईपर्यंत श्री **** यांचे घर आले. अगदी घरच्या गेटपाशी चालकाने गाडी उभी केली. श्री **** खाली उतरले. गाडी निघून गेली. एकदम श्री **** चमकले. वाहनचालकास माझे घर कसे माहित होते? मी तर त्यांना काहीच सांगीतले नव्हते.
श्री स्वामींची अगाध लिला !
‘श्री स्वामी समर्थांनीच मला घरापर्यंत आणून सोडले, एवढया अंधाऱ्या रात्री श्री स्वामी समर्थांनीच माझी साथ केली’ असे श्री **** सर्वांना सांगत असतात.
- ज्योतिषी भविष्य सांगतो परंतू श्री स्वामी समर्थ भविष्य घडवितात याचे हे उदाहरण
एका मुलीच्या पत्रिकेत सातवर्षे लग्न योग नव्हता. सौ. ताईंना तिची पत्रिका बघताच ही गोष्ट समजली. त्यांनी त्या मुलीस स्वामी स्तवन म्हणण्यास सांगीतले. तिने मनापासून स्तवन म्हणण्यास सुरवात केली आणि सहा महिन्यातच तिचे लग्न जमले. श्री स्वामी समर्थ नेहमीच भक्तांच्या मागे उभे असतात.
- नित्य ‘श्री स्वामी स्तवन’ म्हणण्याची उपासना खूप प्रभावी आहे. श्री स्वामी समर्थ
परिवारात सौ. **** एक महिला आहेत. त्यांच्या मुलाची दहावीची परिक्षा सुरु होती. त्या मुलाला सोडायला परिक्षाकेंद्रावर कारने जात व पेपर सुटेपर्यंत तेथेच थांबत व त्यावेळी कारमध्ये त्या परिवाराची ‘सांघीक प्रार्थना’ व ‘स्वामी पदा दंडवत’ या सीडी लावत. सौ. **** जेथे त्यांची कार उभी करत तेथे जवळच एका खाद्यपदार्थांचा stall होता. एकदा त्या महिलेने सौ. **** यांना सांगीतले की त्यांना मुलांचे शिक्षण व वाढता खर्च यामुळे सर्व निभावून नेणे कठीण जाते. त्यातच त्यांच्या यजमानांना गेली ८ वर्षे पगारवाढ मिळाली नव्हती. सौ. **** तिला श्री स्वामी स्तवन म्हणण्यास सांगीतले. केवळ आठ दिवसात त्या महिलेने सौ. **** यांना सांगीतले ‘आम्ही दररोज २८ वेळा स्वामी स्तवन म्हणतो व माझ्या यजमानांना आठ हजार रुपये पगारवाढ मिळाली आहे’
‘श्री स्वामींची कृपा !’
- एका Computer Engineer असलेल्या मुलीची ही कथा – तिला बंगलोरला मोठ्या पगाराची
नोकरी आहे. परंतू नवऱ्याने तिला आर्थिक व्यवहारात फसविले. व्यवसायासाठी मोठी रक्कम त्याने तिच्याकडून घेतली व हातोहात फसवणूक केली. त्यानंतर तीने घटस्पोट घेतला व अत्यंत निराश अवस्थेत बंगलोर येथेच नोकरी करत राहीली. मुलगी बंगलोरला व आईवडिल पुण्यात अशी स्थिती झाली. तिचे आईवडिल बंगलोरला जाऊ शकत नव्हते कारण त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. ह्या मुलीने आईवडिलांना फोन करणे वा त्यांचा फोन घेणे बंद केले. त्या मुलीची आई अत्यंत काळजी करत सौ. ताईंना भेटली. सौ. ताईंनी त्यांना ‘स्वामी स्तवन’ म्हणण्यास सांगीतले. तसेच मुलीकडूनही ही उपासना झाली पाहिजे म्हणून तिचा फोन नंबर घेतला. सौ. ताईंनी मुलीला फोन करून ‘श्री स्वामी समर्थ’ तुझा प्रश्न सोडवितील असे सांगीतले व उपासना करण्यास दिली. मोठ्या नाखुषीने मुलीने उपासना करण्यास सुरवात केली. त्यानंतर ती मुलगी सावरली. तिने आईवडिलांना फोन करण्यास सुरवात केली. आईवडिलही त्यामुळे आनंदले. वडिलांचा हृदयविकाराचा त्रास खूप कमी झाला. पुढे मुलगी हळूहळू दुसऱ्या विवाहास तयार झाली. २०१३ साली तिचा दुसरा विवाह झाला व ती आता सुखी जीवन जगत आहे.
- एक महिला स्वामीभक्त. नेहमी परिवाराच्या प्रार्थनेस येणाऱ्या त्यांच्या इंजीनीयर मुलाला
नोकरी मिळत नव्हती. दोन वर्षे तो नोकरीविना घरीच होता. अत्यंत निराश अवस्थेत त्याच्या आईने त्याला सौ. ताईंकडे आणले. मुलगा तरूण होता व कोणतीही उपासना करण्यास तयार नव्हता. सौ. ताईंनी त्याला उपासनेचे महत्व उदाहरणे देऊन सांगीतले. मोठ्या मिनतवारीने मुलाने उपासनेला सुरवात केली आणि दोन वर्षे प्रयत्न करूनही न मिळणारी नोकरी त्याला लागली. एका नास्तिक मुलाला उपासनेने पूर्णपणे बदलले.
- विरारला राहणाऱ्या एका महिलेची ही कथा – तिचा घटस्फोट झाला होता. ती तिच्या ६
वर्षाच्या मुलासोबत एकटीच रहात होती. रोज जवळजवळ २ तास जाणे व २ तास येण्याचा प्रवास करीत ती मुंबईस नोकरी करीत होती. मुलगा घरात एकटा असे. त्याला सांभाळणारेही कोणीही नव्हते. अशा कठीण परिस्थितीत ती सापडली असता सौ. उज्वलाताईंना भेटण्यास आली. सौ. ताईंनी तिला उपासना करावयास सांगून श्री स्वामी समर्थ तुझी काळजी घेतील असा विश्वास दिला. थोडयाच दिवसात तिला घराजवळच चांगल्या पगाराची नोकरी मिळाली व तिचा त्रास व वेळ वाचला. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताची नेहमीच काळजी घेतात.
- एक स्वामीभक्त आहेत. त्यांच्या जावयाच्या नोकरीत समस्या निर्माण झाली. जावई
मोठ्या हुद्यावर नोकरीत होते. अचानक नोकरी गेली. आर्थिक प्रश्न निर्माण झाला. मुलगी व जावई मोठ्या निराशेने सौ. ताईंना भेटावयास आले. सौ. ताई म्हणाल्या की ‘तुझे वडील अनेक वर्षे श्री स्वामींची भक्ती करीत आहेत श्री स्वामी समर्थ तुझा प्रश्न नक्की सोडवतील’ मुलगी व जावई थोडेसे नास्तिक होते. सौ. ताईंनी उपासना दिली. त्यांनी ती मनापासून केली व लवकरच त्यांना नोकरी मिळाली.