प.पू.मुकुंद महेश्वर करंदीकर उर्फ ‘नाना’ अक्कलकोटच्या स्वामीसमर्थांचे परमशिष्य असून,स्वामी त्यांना ‘बेटा’ अशी हाक मारीत असत.वयाच्या ४१ व वर्षी ‘नानांना’दिव्य साक्षात्कार झाला. स्वामींनी सदेह दर्शन दिले व ‘नोकरी सोडून समाजात भक्ती पेरीत जा’ अशी आज्ञा केली.ऐन उमेदीत एक मुलगा व दोन मुली यांची जबाबदारी असतांना ‘नानांनी’ गुरुआज्ञा प्रमाण मानून नोकरीचा त्याग केला आणि आपल्या जीवननौकेचे सुकाणू स्वामींच्या हाती दिले.
साक्षात स्वामींचा वरदहस्त व सहवास असल्याने ‘नानांच्या’ घरी आनंद व समाधान नांदत होते.नोकरी सोडल्यामुळे पैशांची आवक थांबली.स्वामींच्या प्रेरणेने ,चारीतार्थाकरिता ‘नाना’ पीडितांना औषधे देत असत.असंख्य लोकांच्या समस्या सोडवीत.लोकांना योग्य उपासना सुचवीत.सर्वांना प्रचिती येत असे. अयाचक वृत्तीने जे काही प्राप्त होईल त्यात संसार उत्तम प्रकारे केला. प्रपंचात राहून परमार्थ सफल झाला.