प.पू.मुकुन्द महेश्र्वर करंदीकर (नाना करंदीकर)

(संस्थापक : श्री स्वामी समर्थ परिवार, ठाणे) यांचा अल्प परिचय

 

१९६५ साली श्री स्वामी समर्थांनी श्री मुकुंद महेश्र्वर करंदीकर तथा नाना करंदीकर यांना सदेह दर्शन देऊन साद घातली,‘बेटा तू माझे कार्य कर. समाजात भक्ती पेरीत जा.’

श्री स्वामी समर्थ कार्यासाठी पूजनीय नाना करंदीकर यांनी उडी घेतली. त्यावेळी नानाचे वय वर्ष ४२ होते. ‘नाना’ नोकरीत उच्चपदावर काम करीत होते. उत्तम गृहिणी, २ सुकन्या व एक सुपुत्र ह्यांनी नानांचा संसार पूर्णपणे फुललेला होता.

श्री स्वामी समर्थांनी ‘नानांना’ नोकरीचा त्याग करून लोकांमध्ये भक्ती पेरून लोकांची सेवा करण्याची आज्ञा केली. श्री स्वामी समर्थांची आज्ञा नानांनी आनंदाने मानली. “श्री स्वामी समर्थांनी” नानांना रामदास होण्याची प्रेरणा दिली.

स्वामी आपण कोण आहात ? ह्या नानांच्या प्रश्नास ‘मी महारुद्र हनुमान आहे’ असे उत्तर देऊन हनुमंताचे रूप दाखविले. श्री स्वामी समर्थांनी ‘नानांना’ मार्ग दाखविला – ‘व्याधी ग्रस्तांना व्याधीमुक्त कर’ अशी श्री स्वामी समर्थांची आज्ञा असल्याने श्री स्वामी समर्थांनी नानांना आयुर्वेदिक औषधांचे ज्ञान दिले नानांनी स्वामी प्रेरणेने दिलेल्या औषधांनी अनेक व्याधीग्रस्त व्याधीमुक्त झाले व स्वामी भक्तीत रममाण झाले. स्वामी भक्तीचा प्रसार होऊ लागला.

श्री स्वामी कृपेचा अनुभव घेतलेल्या असंख्य व्यक्ति नानांच्या सहवासात येऊ लागल्या.

१९७६ साल उजाडले. श्री स्वामी समर्थांनी आज्ञा केली. ‘बेटा, अक्क्ल्कोटची पदयात्रा कर.’

श्री स्वामी समर्थ आज्ञेनुसार नानांनी अक्कलकोट पदयात्रा पूर्ण केली. ह्या पदयात्रेत नानांना दिव्य अनुभव मिळाले.

अक्कलकोटच्या पदयात्रेनंतर श्री स्वामी समर्थांनी नानांना ‘ ज्योतिष्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडव ’ असा आदेश दिला. श्री स्वामी समर्थांनी नानांना शक्ती दिली व ज्ञान संपन्नही केले. नानांनी दिलेल्या उपासनेने अनेक व्यक्ती चिंतामुक्त झाल्या व त्यांच्या जीवनात आनंदाचे असंख्य दिप प्रज्वलित झाले.

महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमधील कानाकोपऱ्यातून असंख्य व्यक्ती व्याधी व समस्या निवारणार्थ नानांकडे येऊ लागल्या. स्वामी प्रसाराची वेल बहरू लागली.

१९७९ साल उजाडले – श्री स्वामी समर्थांनी नानांना आज्ञा केली ‘बेटा, जगन्नाथाला चल’—

ठाणे ते जगन्नाथपुरी ह्या पदयात्रेची सिद्धता झाली. खरतर नानांना पायी प्रवासाची सवय नव्हती. पहिला वर्ग, वातानुकुलीत वर्ग, यांनी प्रवास करणारा सुखवस्तु नानांना पायी प्रवास ही कल्पना खरतर कष्टमय वाटली असती पण नानांवर श्री स्वामी समर्थांचा कृपशिर्वाद होता व पायी यात्रेची प्रेरणा हे स्वामी समर्थांची होती. शिवाय स्वामी म्हणाले ‘बेटा चल’ म्हणजे प्रवासात स्वामी बरोबर असणारच, म्हणूनच नानांनी ठाणे ते जगन्नाथपुरी पदयात्रा करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले.

 

 

श्री भगवद्गीतेमधील अभिवाचानाप्रमाणे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माच्या अस्तित्वावर आघात होतात, तेव्हा तेव्हा धर्माचे रक्षण करण्यसाठी परमेश्र्वर पृथ्वीतलावर अवतार घेतो. सज्जनांचे रक्षण व दुर्जनांचा विनाश करून धर्माचे पुनरुज्जीवन करतो.

 

एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या अदभूत व अर्तक्य सामर्थ्याने समाजास धर्मप्रवण बनविले, त्या संतामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचे नाव हे अग्रेसर आहे. आपल्या अंतर्साक्षित्वाने जनसामान्यांना ईश्र्वराभिमुख करण्याचे महान कार्य श्री स्वामी समर्थांनी केले. सर्व विश्वात अनंत रुपात व्यापून राहिलेल्या मुळ देवाने धारण केलेले मानवी स्वरूप म्हणजेच अक्कलकोटचे साक्षात ‘श्री स्वामी समर्थ’ अशी प. पू. नानांची ठाम धारणा आणि अशा श्री स्वामी समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन व मार्गदर्शन प.पू. नानांना घडले. ही त्यांची अनेक जन्मांची पुण्याई फळाला आली. हे सर्व घडले हे पूजनीय नानांच्या ठायी वसत असलेल्या सद्गुण, सदाचार, सन्मार्ग व सत्कर्म साधना या गुणांमुळेचश्री स्वमी समर्थांनी नानांना बेटा म्हणून साद घातली.

प.पू. नानांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे एक सधन, सुखवस्तू व सुसंस्कारित कुटुंबात झाला. जन्म कालाष्टमीचा म्हणून त्यांचे ‘मुकुंद’ असे सुयोग्य नाव ठेवले. श्रीकृष्णासारखा खोडकर व मिष्कील स्वभाव आणि सर्वाना मोहून टाकणारे मन यामुळे ते सर्वांचेच लाडके होते. कुशाग्र बुध्दी व त्याच बरोबर उत्तम शारीरिक संपदा, कौटुंबिक सुसंस्कार यामुळे त्यांचे बालपण समृद्ध झाले. देशभक्तीचा वारसा त्यांना वडिलांकडून लाभला आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून काही वर्षे काम केले. त्या नंतर त्यांनी अनेक नावाजलेल्या कंपन्यात काम केले व ते ‘सेल्स एक्झीक्युटीव’ या पदापर्यंत पोहोचले. वयाच्या २३ व्या वर्षी विवाह करून ते गृहस्थाश्रमी झाले. दोन मुली आणि एका मुलाला जन्म देऊन त्यांचा संसार बहरला.

सत्कर्माच्या यज्ञाने प.पू.नानांनी परमेश्र्वराला प्रसन्न केले. आणि ईश्र्वराने श्री स्वामींच्या स्वरुपात त्यांना ‘बेटा’ म्हणून पुकारले व आपले सर्व जीवन समाजात स्वामीभक्तीची फुले फुलविण्यासाठी व्यतीत कर अशी आज्ञा केली.

वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी प.पू.नानांनी आपली सर्व सांसारीक जबाबदारी श्री स्वामींच्या चरणी वाहून स्वामी कार्यास सुरवात केली.

व्याधीग्रस्तांना श्री स्वामी कृपेने औषधे देऊन रोगमुक्त केले. सांसारीक जबाबदारीने पीडलेल्या दुःखीतांना श्री स्वामी प्रेरणेने सुटसुटीत उपासना देऊन चिंतामुक्त केले.

समाजातील जास्तीत जास्त लोकांना स्वामीकृपेचा लाभ देण्यासाठी त्यांनी स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार दोन पदयात्रा केल्या. सन १९७६ मध्ये ठाणे ते अक्कलकोट व सन १९७९ मध्ये ठाणे ते जगन्नाथपुरी अशा पदयात्रा करून त्यांनी असंख्य लोकांना स्वामीभक्तीची गोडी लावली. अनेकांच्या संसारात आनंदाचा मळा फुलविला, अनेकांचे जीवन मंगलमय केले.

या दोन्ही पद्यात्रेंचा अनुभव त्यांनी ‘आनंद यात्रा’ व ‘लक्ष लक्ष पावलांची कथा’ या दोन पुस्तकात शब्दांकित केला आहे.

श्री स्वामींचे कार्य त्यांच्या आज्ञेनुसार सुसंघातीतपणे व सुरळीत चालविण्यासाठी ‘श्री स्वामी समर्थ परिवार’ या संस्थेची स्थापना केली.

प.पू. नानांना ह्या स्वमिकार्याच्या मार्गावर त्यांची पत्नी मनोरमा यांची मोलाची साथ लाभली. अत्यंत कठीण काळात म्हणजेच श्री स्वामी समर्थ प.पू. नानांना शिष्योत्तम म्हणून घडवून घेत असतांना, मनोरमा ह्या आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या व त्यांच्या कार्यात तःलाही अर्पण केले.

श्री स्वामी समर्थ परिवाराची स्थापना व प.पू.नानांचे कार्य -

 

१ ऑक्टोबर १९७९ विजयादशमीचा पवित्र मुहूर्त या दिवशी प.पू. नानांनी ‘श्री स्वामी समर्थ परिवार’ या संस्थेची स्थापना ठाणे येथे केली. परिवार स्थापनेमागील उद्देश हा श्री स्वामींचे कार्य सुसंघातीतपणे व सुरळीत चालावे व त्या योगे सर्व लोकांचे हित व्हावे हा असल्याने ‘सकल जन हिताय’ हे ब्रिदवाक्य त्यांनी संस्थेसाठी दिले. आणि त्यानुसार कार्य चालवण्यास सुरवात केली.

‘नाना’ हे उत्तम कवी होते. त्यांनी श्री स्वामींवर रचलेली अनेक काव्ये आहेत. त्यातील निवडक काव्ये वेचून त्यांनी ‘सांघिक प्रार्थना’ हे प्रार्थनेचे पुस्तक त्याच दिवशी प्रकाशीत केले व ठाणे या प्रमुख केंद्रावर दर महिन्याच्या एक तारखेस सांघिक प्रार्थना सुरु केली. सांघिक प्रार्थनेने समाजाचा उत्कर्ष तर होतोच तसेच प्रार्थनेत भाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन सर्वांगाने फुलून आनंदमय होते, हे ‘नाना’ जाणून होते आणि म्हणून त्यांनी सांघिक प्रार्थनेचे महत्व जनसामान्यांना पटवून देऊन त्यांना सांघिक प्रार्थनेत सहभागी करून घेतले. आज जवळजवळ ३५० ते ४०० स्वामीभक्त ठाणे येथील प्रार्थनेत सहभाग घेतात. प. पू. नाना निश्चयपूर्वक सांगत की ‘तुमचे सर्व प्रश्न हे सांघिक प्रार्थनेत सहभागी होऊन सुटतील’ ते म्हणत की सांघिक प्रार्थना हि १०० टक्के फलदायी होते. तर व्यक्तिगत स्वरूपातील प्रार्थना ही फक्त ५० टक्के फलदायी ठरते. ( ही सांघिक प्रार्थना पुस्तक व सीडीच्या स्वरुपात या वेबसाईट वर उपलब्ध आहे.)

सांघीक प्रार्थनेचे महत्व लोकांना पटल्याने या प्रार्थना, प. पू. नानांच्या मार्गदर्शनानुसार, अनेक ठीकाणी

सुरु करण्यात आल्या आहेत.

 

नानांची पदयात्रा कशासाठी होती ?

साऱ्यांचे संसार सुखाचे व्हावेत ह्या साठी पदयात्रा

जगन्नाथ पुरीची पदयात्रा पूर्ण झाली. श्री स्वामी समर्थांनी आज्ञा केली “ निसर्गरम्य ठिकाणी मला नेऊन बसव, व तुला ज्या रुपात दर्शन दिले तशी मुर्ती घडव.

श्री स्वामींचा मठ व श्री स्वामी समर्थांची आजानुबाहू चैतन्यशाली मुर्ती घडवण्या संबंधीचे चिंतन सुरु झाले. श्री स्वामी समर्थांचा मठ स्थापन करण्यासाठी संस्था स्थापन केली.

१ ऑक्टोबर १९७९ विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर ‘श्री स्वामी समर्थ परिवार’ ह्या संस्थेची स्थापना झाली. श्री स्वामी समर्थ कृपेने मठासाठी लोणावळा येथे जमीन मिळाली. उत्तम मूर्ती घडवण्याचे काम सुरु झाले.

 

श्रीस्वामी भवन, नांगरगांव, लोणावळा (जि. पुणे)

इ. सन १९८० प. पू. नानांच्या कार्याने आनंदित होऊन प्रत्यक्ष श्री स्वामींनी नानांना मुंबई-पुण्यानजीक, शांत, रम्य व निसर्गाने नटलेल्या ठिकाणी मंदिर बांधण्यची आज्ञा दिली.

इ.सन १९८१ साली श्रीस्वामी भवनासाठी लोणावळा शहरातील नांगरगांव येथे सुंदर, निसर्गाच्या सानिध्यातील व रेल्वे, बस वा इतर वाहनांनी सहज येता येईल अशी जागा प.पू. नानांना सहज उपलब्ध झाली. जणू काही ती जागा प्रत्यक्ष श्री स्वामींनी ‘स्वामिभवनासाठी’ राखून ठेवली होती.

त्याचवेळी श्री स्वामींच्या प्रेरणेने पूजनीय नानांनी ‘श्री स्वामी समर्थ’ हा षडाक्षरी मंत्रजप लिहिण्याचे आवाहन लोकांना केले व त्यास सर्व ठिकाणच्या लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. संकल्प १३ कोटी जपाचा होता. परंतू प्रत्यक्षात जपसंख्या २४ कोटी झाली. सदर जपाच्या वह्या नांगरगांव येथील श्रीस्वामी समर्थांच्या अजानुबाहू मूर्तीखाली तळघरात ठेवण्यात आल्या आहेत.

इ.सन १९८१ साली स्वामीभवनासाठी जागा घेतली व ३१ मे १९८२ रोजी त्या जागेचे भूमीपूजन झाले. जवळजवळ ३००० भक्त त्यावेळी उपस्थित होते.

 

१५ एप्रिल, १९८४ (हनुमान जयंती) रोजी श्री स्वामींच्या भव्य अजानुबाहू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. श्री स्वामींच्या सामर्थ्याचा अविष्कार पुन्ह एकदा प्रत्ययास आला. प.पू. नानांचे स्वप्न साकार झाले आणि प्रत्यक्ष श्रीस्वामी लोणावळ्याच्या मठात अवतरले.

 

श्री स्वामी भवनातील दैनंदिन कर्यक्रम, दर्शन, महाप्रसाद

श्री स्वामी भवनात रोज सकाळी ५.३० वाजता श्री स्वामींच्या पूजेचा व पादुकांवरील अभिषेकाचा सोहळा साजरा होतो. त्यावेळी अनेक भक्त उपस्थित असतात.

दर्शनासाठी मंदिर सकाळी ५.३० ते रात्री ८.३० पर्यंत उघडे असते.

शांत, स्वच्छ व बाजूच्या बागेतील गुलाबाच्या असंख्य ताटव्यांनी फुलून सुशोभित केलेल्या या मंदिरात अनेक स्वामीभक्त येत असतात.

हे मंदिर ‘ध्यान मंदिर’ म्हणून ओळखले जाते. निरव शांतता व मानसिक तृप्ती देणारे हे मंदिर श्री स्वामींच्या व प.पू. नानांच्या आशिर्वादाने भक्तांचे मनोरथ पूर्ण करीत आहे. याचा अनुभव अनेकांना येथे आल्यानंतर येतो.

दुपारी १२.३० ते १.०० च्या दरम्यान श्री स्वामींना महानैवेद्य दाखविला जातो व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप उपस्थित भक्तांना व येणाऱ्या भक्तांना केले जाते.

 

समस्यापूर्ती व उपासना
 

प.पू.नाना विज्ञान, आधुनिकता आणि अंधश्रद्धा यांच्या आहारी नको तेवढे जाणाऱ्या समाजाला विचारी व सामर्थ्यवान बनविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. रंजल्यागांजलेल्या लोकांना त्यांनी अध्यात्ममार्गाचा प्रकाश दाखविला. सन्मार्ग, सत्कर्म व सदाचार आचरण्यात आणणाऱ्या ‘नानांना’ श्रीस्वामी समर्थांनी ‘उपासना’ सांगण्याची मंत्रशक्ति दिली. प.पू. नानांनी सांगीतलेल्या सहजपणे करता येणाऱ्या सोप्या व सुटसुटीत उपासनेने अनेकांचे गहन प्रश्न सुटले.

प.पू. नाना स्वामी चरणी विलीन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी मनोरमावहिनी श्री स्वामी समर्थ परिवाराच्या कार्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या. श्री स्वामी समर्थ कृपेने त्यांनी देखील अनेक व्यक्तींना मार्गदर्शन करून दुःखमुक्त केले.

आजही प.पू. नानांच्या सुकन्या सौ. उज्ज्वलाताई दाते या श्री स्वामींच्या कृपेने व प.पू. नानांच्या आशिर्वादाने साध्या व सोप्या ‘उपासना’ सांगून अनेक पीडीतांना दुःखमुक्त करतात.

अनेक दुर्धर रोगाने ग्रासलेल्या लोकांना सुकन्या व्याधीमुक्त करतात.